बॉलीवूड मध्ये हॉरर कॉमेडी चित्रपटांनी धुमाकूळ घातलेला असताना त्यात मराठी चित्रपट सृष्टीही मागे नाही. गौरव मोरे, मकरंद देशपांडे, सक्षम कुलकर्णी सुरेश विश्वकर्मा, संदीप पाठक यांची भूमिका असलेल्या अल्याड पल्याड या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि आता याचा सिक्वेल अल्याड पल्याड २ची घोषणा झालेली आहे.
पहिल्या भागाची कथा कोकणातील एक निराळी परंपरा म्हणून ‘गावपळण’ या भोवती फिरत राहते. यात संपूर्ण गाव वेशीबाहेर जातात. गावातील प्रत्येक माणसे, पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशीबाहेर राहतात. कोणी म्हणतं की, ‘त्यांच्या पूर्वजांचा आत्मा या दिवसांमध्ये गावात येऊन राहतो’, तर कोणी या काळात गावात भुतांचा वावर असतो. सर्व गाव रिकामे असताना गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी यांचे पात्र मागे गावात शिरतात आणि मग त्यांना ज्या काही प्रसंगांना सामोरे जावे लागते याची कथा अल्याड पल्याड मध्ये मांडलेली आहे.
पहिल्या भागात सर्वच कलाकारांनी उत्तमरीत्या भूमिका साकारलेल्या असून गौरव मोरे च्या भूमिकेने लोकांचे मन जिंकून घेतलेले आहे. भयाबरोबरच विनोदाचीसुद्धा योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत मराठीत असे निरनिराळे प्रयोग होत रहावे असे मत व्यक्त केले होते. या चित्रपटाने कमी वेळात कोट्यावधींची कमाई देखील केलेली आहे.
प्रेक्षकांनी दिलेली ही पावती पाहून निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर यांनी चित्रपटाचा सिक्वेल ‘अल्याड पल्याड २’ ची घोषणा केलेली असून जून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अल्याड पल्याड २ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक जुनाट बंद दरवाजा दिसत असून त्यावर विचित्र मूर्ती असलेली कडी तसेच या पोस्टचे कॅप्शन ‘प्रेक्षकांना पुन्हा घाबरवण्याची सोय झाली.’ हे आणखीनच उत्सुकता वाढवतेय. आता या सिक्वेलमध्ये गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी यांच्या पात्रांना कोणत्या नव्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे पाहण्यासाठी पुढच्या वर्षाच्या जून महिन्यापर्यंतची वाट प्रेक्षकांना पहावी लागेल.